Panjab Dakh News: नवीन वर्षाची सुरुवात होताच राज्यातील हवामानात बदल जाणवू लागला असून अनेक भागांत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी 1 जानेवारी 2026 रोजी राज्यातील शेतकऱ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत पुढील काही दिवसांचा आणि संपूर्ण 2026 वर्षाचा महत्त्वाचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. सध्या शेतकऱ्यांमध्ये थंडी, ढगाळ हवामान आणि येणाऱ्या पावसाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावर डख यांनी सविस्तर आणि दिलासादायक माहिती दिली आहे. Panjab Dakh News
पंजाब डख यांच्या मते, 1 जानेवारीपासून राज्यात ढगाळ वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली असून हे ढगाळ हवामान किमान पुढील आठवडाभर टिकण्याची शक्यता आहे. या ढगांमुळे सध्या असलेली तीव्र थंडी काही प्रमाणात कमी होईल. दिवसाच्या वेळी गारवा जाणवेल, पण कडाक्याची थंडी कमी होईल, असा अंदाज आहे. हे बदलते वातावरण वेलवर्गीय पिके, ऊस लागवड, तसेच तरबूज, खरबूज लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. जमिनीत ओल टिकून राहण्यास मदत होणार असल्याने पिकांच्या वाढीस चालना मिळेल.
मात्र, ढगाळ वातावरणामुळे काही अडचणीही निर्माण होऊ शकतात, याकडे डख यांनी लक्ष वेधले आहे. ढगांमुळे सकाळी धुके आणि ‘धुई’ पडण्याची शक्यता वाढते. अशा वातावरणात हरभरा, द्राक्ष, डाळिंब यांसारख्या पिकांवर रोग आणि कीड वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे या पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी वेळेवर बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची फवारणी करून पिकांची योग्य काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे. थोडीशी दुर्लक्ष केली तर उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
2026 मधील पावसाबाबत बोलताना पंजाब डख यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार 2026 मध्ये राज्यात पाऊस हा साधारण ‘सरासरी’ इतकाच राहणार आहे. गेल्या काही वर्षांप्रमाणे अतिवृष्टी, ढगफुटी किंवा दुप्पट पावसामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. सरासरी पावसामुळे सोयाबीन, कापूस, हरभरा, ज्वारी, बाजरी यांसारखी पिके चांगली येतील आणि उत्पादन समाधानकारक राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
पावसाची सुरुवात साधारण 7 ते 8 जूनच्या दरम्यान राज्यात होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पावसाची नियमित हजेरी राहील, तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर अधिक वाढेल, असा अंदाज आहे. विशेष म्हणजे यावर्षी परतीचा पाऊसही चांगला राहण्याची शक्यता असून, याचा फायदा रब्बी हंगामासाठी होऊ शकतो. जमिनीत ओल टिकून राहिल्याने पुढील पिकांची तयारी करणे शेतकऱ्यांना सोपे जाईल.
थंडीबाबत माहिती देताना पंजाब डख यांनी सांगितले की, राज्यात 20 जानेवारीपर्यंत थंडीचा प्रभाव जाणवत राहील. ही थंडी गहू आणि हरभरा यांसारख्या रब्बी पिकांसाठी अत्यंत पोषक ठरणार आहे. थंड आणि कोरडे वातावरण या पिकांच्या वाढीस मदत करेल. सरासरी पाऊस, योग्य थंडी आणि अनुकूल हवामान यामुळे 2026 हे वर्ष शेतकऱ्यांसाठी समाधानकारक आणि प्रगतीचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान हवामानात अचानक काही मोठे बदल झाल्यास त्याबाबत वेळोवेळी नवीन अंदाज दिला जाईल, असेही पंजाब डख यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत अंदाज आणि माहितीवर लक्ष ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. एकंदरीत, ढगाळ वातावरणानंतर सरासरी पावसाचे संकेत मिळत असल्याने 2026 हे वर्ष शेतीसाठी आशेचे आणि दिलासादायक ठरण्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहेत.
हे पण वाचा | आजपासून आठवा वेतन आयोग लागू? आता सरकारी कर्मचाऱ्यांना किती पगार मिळणार पहा
