Havaman Andaj 2026: राज्यात सध्या सकाळ-संध्याकाळ कडाक्याची थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. गावखेड्यांमध्ये पहाटे अंगावर चादर न घेता बाहेर पडणं अवघड झालं आहे, तर शहरांमध्येही थंडीचा चटका वाढत चालला आहे. मागील काही दिवसांत मुंबईसह काही भागात हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळालं होतं, त्यामुळे थंडीची तीव्रता थोडी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा हवामानाने कलाटणी घेतली असून, 8 जानेवारीपासून संपूर्ण देशात हवामानात मोठा बदल होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उत्तर भारतात हाडं गोठवणारी थंडी अनुभवायला मिळणार असून, त्याचवेळी दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये ऐन हिवाळ्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Havaman Andaj 2026
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवार 8 जानेवारीपासून उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पूर्व उत्तर प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि झारखंड या भागांमध्ये दिवसभर तीव्र थंडी जाणवणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये किमान तापमान पाच ते दहा अंशांच्या दरम्यान नोंदवले जात आहे.
छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे तब्बल 3.3 अंश सेल्सिअस इतकं कमी तापमान नोंदवण्यात आलं असून जम्मू-काश्मीर लडाखसह डोंगराळ भागांमध्ये अनेक ठिकाणी तापमान शून्याच्या खाली घसरलं आहे. पुढील काही दिवस या भागांत थंडीचा जोर अधिक वाढणार असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे.
थंडीबरोबरच दाट धुक्याचाही मोठा धोका निर्माण झाला आहे. उद्यापासून पुढील तीन दिवस पूर्व राजस्थान, बिहार, पंजाब, हरियाणा-चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांत सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश उत्तराखंड आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरा येथे 12 जानेवारीपर्यंत धुक्याचा प्रभाव कायम राहणार आहे. याचा फटका रस्ते वाहतूक, रेल्वे आणि विमानसेवेलाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकीकडे उत्तर भारत थंडी आणि धुक्यात गारठलेला असताना दुसरीकडे दक्षिण भारतात वेगळंच चित्र पाहायला मिळणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्यापासून 11 जानेवारीपर्यंत तामिळनाडूमध्ये काही भागांत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडू शकतो. केरळ आणि माहे येथेही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून या भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऐन हिवाळ्यात पडणारा पाऊस उभ्या पिकांना धोका ठरू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
एकूणच 8 जानेवारीपासून देशभरात हवामानाचा खेळ रंगणार असून कुठे कडाक्याची थंडी लोकांना घराबाहेर पडू देणार नाही तर कुठे पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस हवामानाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष न करता सतर्क राहणं गरजेचं आहे.
हे पण वाचा : नवीन वर्ष सुरू होताच राज्यात इतके दिवस होणार मुसळधार पाऊस? पंजाबरावांचा नवीन अंदाज
